पश्चिम रेल्वेकडून अंधेरीतील गोखले पुलाचे पाडकाम सुरू
मुंबई : लोकवार्ता टाइम्स
पश्चिम रेल्वेकडून अंधेरीतील गोखले पुलाचे पाडकाम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे. यामुळे नियोजित वेळेत पुनर्बांधणी होण्याची
शक्यता व्यक्त होत आहे. पुलाची उभारणी महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे पाडकाम करताना होणाऱ्या आवाजाचा रहिवाशांना त्रास होतो असे सांगत माजी लोकप्रतिनिधी अभिजीत सामंत यांनी महापालिका आणि पश्चिम रेल्वेला पत्र पाठवून काम बंद करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत महापालिकेच्या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने पाडकाम थांबवले होते. गोखले पुलाला दोन जोड रस्ते असून पश्चिमेकडील दिशेचे पाडकाम पूर्ण करून फेब्रुवारीअखेर आणि पूर्वेकडील काम मार्चअखेर पूर्ण करण्याचे निश्चित केलेले आहे. मात्र काम थांबल्यामुळे पश्चिमेकडील काम पूर्ण होण्यास काही दिवसांचा वेळ लागणे अपेक्षित आहे. मात्र पूर्वेकडील काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे करणार असून उभारणी महापालिका करणार आहे. पाडकाम करताना वाहनधारकांना त्रास होणार नाही, याची काळजी पालिका आणि पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येत आहे. नियोजित वेळेत काम पूर्ण होईल, असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.
रिपोर्टर